गोंदिया : धकाधकीच्या जीवनात काही क्षण निसर्ग सान्निध्यात घालविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे स्थान असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ३० जून रोजी पर्यटनासाठी बंद होणार आहे. थेट १ ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचे गेट उघडणार असल्याने पर्यटकांचा मात्र हिरमोड होणार आहे.
जिल्ह्याला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प एक वरदान लाभले आहे. प्रकल्पात विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांसोबत वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक प्रकल्पात जंगल सफरीसाठी येतात. शिवाय, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही वेळ काढून निसर्ग सान्निध्यात घालविण्यासाठीही पर्यटकांची येथे नेहमीच रेलचेल असते.
मात्र, पावसाळा सुरू झाल्यामुळे पावसाळ्यातील जंगलातील अंतर्गत कामकाजासाठी हा काळ असतो. शिवाय, विपुल हिरवळ असल्यामुळे प्रकल्प आता मंगळवारपासून (दि.३०) पर्यटनासाठी बंद केला जाणार आहे. तर थेट १ ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचे गेट उघडले जाणार आहेत.
१५ तारखेलाच होतो बंद
७ जून रोजी मृग नक्षत्र लागत असून, पावसाळ्याला सुरुवात होते व दरवर्षी व्याघ्र प्रकल्प १५ जूनपासून पर्यटनासाठी बंद केला जातो. मात्र, यंदा आता ३० जून जवळ आली असतानाही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. परिणामी प्रकल्प बंद करण्यासाठी मुदत वाढवून ३० जून करण्यात आली.
तीन महिन्यांत ९१३० पर्यटकांची एन्ट्री
उन्हाळ्याचा काळ हा जंगल सफरीचा काळ असतो.
कारण, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी दाट जंगलातून बाहेर येतात.
प्रामुख्याने वाघोबाचे याच काळात सर्वाधिक दर्शन होते.
पर्यटकांची ट्रिप व्याघ्राशिवाय पूर्ण होत नाही.
विशेष म्हणजे, मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात सर्वाधिक ५ हजार २५१ पर्यटकांनी जंगल सफरी केली आहे.
तीन महिन्यांतील पर्यटक व महसूल तक्ता
मार्च – २,०८५ पर्यटक – महसूल ५,५५,३६२
एप्रिल – १,७९४ पर्यटक – महसूल ४,७६,५२७
मे – ५,२५१ पर्यटक – महसूल १३,४९,६९९




























