शासन झोपेत की विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात?
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे ) मौजा राजोली भरनोली स्वातंत्र्याला तब्बल ७८ वर्षे उलटली, पण या गावात शिक्षणाचं स्वातंत्र्य अजून आलेलंच नाही! अर्जुनी मोर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील राजोली भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत तब्बल १२४ विद्यार्थी शिकत असताना, शिक्षक फक्त एकच!एका हातात फळा पुसायचा, दुसऱ्या हातात दुसऱ्या वर्गात धडा सुरू करायचा — ही या शाळेची रोजची कहाणी. एका वर्गात वर्णमाला, दुसऱ्यात पाढे, तर तिसऱ्यात इतिहास — अशा बहुवर्गीय गोंधळात एकट्या गुरूजींची जीवघेणी तारेवरची कसरत सुरू आहे. गाव अतिदुर्गम असल्याने शिक्षक येथे रुजू होण्यास टाळाटाळ करतात. शासन मात्र वर्षानुवर्षे “लवकरच नेमणूक होईल” अशा खोखल्या आश्वासनांचीच उधळण करत आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षक नेमणूक नाही, आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आहे!
“आमच्या लेकरांना शिकवायला दुसरा गुरुजी मिळणार की नाही?”— ग्रामस्थांचा थेट सवाल शासनाला
स्थिती एवढी बिकट आहे की गावातील पोलीस पाटील सुद्धा अधूनमधून शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतात.
ही शाळा शिक्षकविहीन नाही, तर शासनाच्या उदासीनतेचा जिवंत नमुना आहे! शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती अर्जुनी मोरच्या सभापती आम्रपाली डोंगरवार यांना तातडीचे लेखी निवेदन दिले. या वेळी योगराज औरासे (अध्यक्ष), नाझीमा सय्यद (उपाध्यक्ष), शिवदास कोवे, अश्मीना गायकवाड, कविता नाकाडे, रसिका राऊत, राजू नाकाडे, भुनेश्वर गायकवाड, नारायण नाईक, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.






























