नवेगाव बांध :- धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनातून क्षणभर तरी सुटका हवी असेल, तर नवेगाव बांध येथील राष्ट्रीय उद्यान (डेपो) हे ठिकाण सध्या नागरिकांसाठी स्वप्नवत ठरत आहे. निसर्गसौंदर्य, साहस, करमणूक आणि कुटुंबीयांसोबत अविस्मरणीय क्षण यांचा सुरेख संगम साधत नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाने अक्षरशः पर्यटकांना वेड लावले आहे.
उद्यानात प्रवेश करताच डोळ्यांचे पारणे फिटावे असे रॉक गार्डन, हिलटॉप गार्डन, मिरर हाऊस आणि ग्रीन पार्क पाहायला मिळते. प्रत्येक पावलावर नवे आकर्षण, प्रत्येक वळणावर आनंदाचा नवा अनुभव पर्यटकांची पावले थांबू देत नाही.
लहानग्यांच्या आनंदासाठी उभारलेले आधुनिक बालउद्यान हे कुटुंबीयांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. रॉक गार्डन परिसरात असलेली लहान मुलांची बोटिंग, उंच उडीसारखी साहसी खेळणी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात, तर पालकही त्या आनंदात सहभागी होतात.
ग्रीन पार्क रेस्टॉरंट परिसरातील लहान रेल्वे प्रवास हा तर खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. रेल्वेने फेरफटका मारताना मुलांच्या डोळ्यातील चमक आणि मोठ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे बालपण पुन्हा जिवंत करणारे हास्य पाहून वातावरण भारावून जाते. हिरवाईतून धावणारी ही रेल्वे जणू आठवणींचा प्रवास घडवून आणते.
ग्रीन पार्कमध्ये मनसोक्त वेळ घालवल्यानंतर रॉक गार्डनजवळ उभा असलेला उंट पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. उंटावर बसून फेरफटका मारताना नागरिकांना जणू वाळवंटात असल्याचा अनुभव मिळतो, आणि हा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी उसळते.
याच परिसरातील मिरर हाऊस हे हास्य, आश्चर्य आणि उत्सुकतेचे केंद्र बनले असून, आरशांत दिसणारी विविध रूपे पाहून मुलेच नव्हे तर मोठेही मनमुराद आनंद घेत आहेत.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानातील जे.टी-पॉइंट, मालगुजरी तलावाचे शांत व रमणीय दृश्य, पुरातन हनुमान मंदिरातील अध्यात्मिक समाधान, तसेच एमटीडीसीची दर्जेदार निवास व्यवस्था यामुळे पर्यटकांचा मुक्काम अधिक सुखद ठरत आहे. एकदा येथे आलेला पर्यटक पुन्हा कधी यायचे याचेच नियोजन करू लागतो, हेच या ठिकाणाचे यश आहे.
निसर्ग, पर्यटन, करमणूक आणि संस्कृती यांचा अप्रतिम संगम साधणारे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे सध्या केवळ पर्यटनस्थळ न राहता, प्रत्येक कुटुंबासाठी एक भावनिक आठवणींचे ठिकाण बनत आहे. “एकदा भेट दिली की पुन्हा-पुन्हा यावेसे वाटते,” अशी भावना पर्यटकांच्या मनात रुजवणारे नवेगाव बांध हे खऱ्या अर्थाने विदर्भातील पर्यटनाचा श्वास बनत आहे.





























