… जि.प.प्रशासन ढिम्म, लोकप्रतिनिधी गप्प…
अर्जुनी मोरगाव संतोष रोकडे
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनहित सोडून उद्योगपतींचे हित साध्य करू लागले की लोकशाहीची मूल्य पायदळी कशी तुडवली जातात याचे उत्तम उदाहरण शहरातील बरडटोली स्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.गोरगरिबाचे विद्यापीठ म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा.या शाळांना ग्रहण लावण्याचे काम रखवालदारचं करतात.ही समस्याग्रस्त आणि वादग्रस्त शाळा या ना त्या कारणाने चर्चेत असते.भर उन्हाळ्यात इटीयाडोह कॅनॉलच्या बॅक वॉटर मुळे शाळेमध्ये पूर येते.पावसाळ्यामध्ये परीस्थिती सांगायची गरज नाही.मुळात 2007 मध्ये झालेले शाळेचे बांधकाम सदोष असल्याने ही परिस्थिती उद्भवते.अठरा वर्षात शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहे.शाळा समितीच्या वारंवार पाठपुराव्यामुळे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 2024-25 ला 13.50 लक्ष रुपयाची एक वर्ग खोली मंजूर झाली. फरवरी 25 मध्ये कार्यारंभ आदेश मिळाले. एप्रिल महिन्यात वर्ग खोलीचे मोठ्या थाटात भूमिपूजन झाले.सदर वर्गखोलीचे बांधकाम खाजगी लेआऊट मध्ये होत असल्याची तक्रार लेआउट मालक दादा फुंडे यांनी केल्याने बांधकाम बंद झाले.कधी बांधकाम सुरू तर कधी बंद हा खेळ खंडोबा अद्यापही सुरूच आहे.
आठ महिने लोटले मात्र जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग ही जागा नक्की कुणाच्या मालकीची हा शोध घेण्यास असमर्थ आहे. शाळा व्यवस्थापन समितीने या संदर्भात पालकमंत्री,आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. बांधकाम त्वरित सुरू करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलणाचा इशारा दिला.आंदोलन होऊ नये म्हणून संबंधित विभागाने बांधकाम सुरू करण्याचे कंत्राटदाराला सांगितले. बांधकाम सुरू झाले पुन्हा तीन दिवसांत शिक्षणाधिकारी यांच्या तोंडी आदेशाने बांधकाम बंद करण्यात आले.बंद का करण्यात आले याचे उत्तर कोणाकडे नाही. विशेषता शासकीय कामकाज दस्तावेजावर चालते मात्र जिल्हा परिषद गोंदियाचा कारभार तोंडी आदेशावर चालत असल्याचा प्रकार सुरू आहे.कुठलाही पत्रव्यवहार होत नाही.शासन सर्वसामान्यांचे की खाजगी हिताचे? असा प्रश्न जनमानसात पडला आहे.शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला स्वखर्चाने वारंवार जिल्हा परिषदेच्या फेऱ्या घालतात.त्या महिलांची प्रशासनाला कीव येणार का?
वर्ग खोली बांधकाम शासकीय गटात
शाळा असलेला गट क्रमांक 244 हा शासकीय आहे.शालेय इमारतीसमोर राणी दुर्गावती यांचा जीर्ण पुतळा होता.नवीन वर्गखोली मंजूर झाली मात्र बांधकामास जागा अपूर्ण असल्याने राणी दुर्गावती समितीच्या महिलांनी पुढाकार घेत पुतळ्याच्या ठिकाणी वर्ग खोली बांधकाम करण्याची सहमती दिली. पुतळा असेपर्यंत लेआउट मालकाला जाग का आली नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
आधी शाळा नंतर लेआउट?
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे बांधकाम 2007 मध्ये सुरू झाले.फुंडे यांनी भालचंद्र राजाभोज यांच्याकडून 1998-99 मध्ये शेती खरेदी केली. सदर शेती २०११ ला अकृषक करण्यात आली. याच दरम्यान राणी दुर्गावती यांचा पुतळा स्थापन करण्यात आला. शेती खरेदीच्या आठ वर्षांनी शाळा तयार झाली.माझ्या मालकीच्या जागेत शाळा आहे असे म्हणणारे फुंडे इतके दिवस गप्प का होते असा प्रश्न निर्माण होतो.

जागेचा शोध कोण घेणार?
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने वर्ग खोली बांधकामाचे लेआउट दिले. बांधकाम सुरू झाले.जागेचा वाद निर्माण झाला.सदर जागा कुणाच्या मालकीची हा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची नाही का? हे प्रकरण जाणीवपूर्वक टाळले जात असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने सदर गट मोजणी करून हा प्रश्न मार्गी लावता येऊ शकतो. प्रशासन गप्प का? सार्वजनिक हितापेक्षा खाजगी हीत जोपासण्यात अधिकाऱ्यांना रस आहे का? असे अनेक प्रश्न उद्भवतात.
मागील आठ महिन्यापासून रेंगाळत असलेला हा प्रश्न मार्गी लागेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आता आंदोलन उभारणार
नियोजित जागी वर्गखोली बांधकाम होणार.प्रशासनाची दुटप्पी भूमिका लक्षात येत आहे.त्वरित तोडगा निघाला नाही तर विद्यार्थी, पालक आणि शाळा समिती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करेल.
सौ.रुचा भोवते
अध्यक्ष-शाळा व्यवस्थापन समिती





























