गोंदिया जिल्ह्यात तब्बल १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; विविध पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी
गोंदिया, दि. १ जुलै : गोंदिया जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून, तब्बल १७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक गोरख (सुरेश) भोमरे यांनी ३० जून २०२६ रोजी हे आदेश जारी केले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नव्या ठिकाणी रुजू होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांची प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रविण बोरकुटे यांच्याकडे गोंदिया शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली असून, वैभव पवार यांची गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तिरुपती राणे यांच्याकडे रामनगर पोलीस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला असून, रामदास शेवते यांची रावणवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. रवि नागोसे यांची सालेकसा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी तर निळकंठ कुकडे यांची आमगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये कमलेश सोनटक्के यांची डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी, तर गणेश वनारे यांची देवरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती विशेष लक्षवेधी ठरली आहे. तसेच मंगेश काळे यांच्याकडे अर्जुनी-मोर पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे. महिला पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांची गोरेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते यांची दवनीवाडा, चेतन ढेकणे यांची केशोरी, तर धीरज राजूरकर यांची गंगाझरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर वर्मा यांच्याकडे बीडीडीएस पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, प्रणिल पाटील यांची वाचक, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक निलकमल लिल्हारे यांची दवनीवाडा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन ढेकणे यांनी बेस कॅम्प मुरकुटडोह येथील कार्यभार पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल मोरे यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वप्निल मोरे हे पुढील आदेशापर्यंत एओपी पिपरिया येथील जबाबदारीसह बेस कॅम्प मुरकुटडोहचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.
या प्रशासकीय फेरबदलामुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजात अधिक गतिमानता व कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




























