नवी दिल्ली दि. 10 नोव्हेंबर 2025 : राजधानी दिल्ली आज सोमवारी संध्याकाळी एक भीषण स्फोटाने हादरली. लाल किला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभी असलेली कार अचानक उडाली आणि काही क्षणातच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या, काही वाहनांना आग लागली आणि रस्त्यावर मलबा पसरला. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
स्फोटाची वेळ सायंकाळी सुमारे 6 वाजून 52 मिनिटे अशी होती. तेव्हा कार सिग्नलवर उभी होती आणि काही क्षणातच ती स्फोटाने उडाली. काही मिनिटांत दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व जखमींना एल.एन.जेपी. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
तपास सुरू, एनआयए आणि एनएसजी घटनास्थळी

घटनेनंतर दिल्ली पोलीसांनी लाल किला परिसर सील केला असून एनआयए, एनएसजी आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.दिल्ली पोलीस आयुक्तांनी सांगितले की, “स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू आहे. परिसरातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कोणताही निष्काळजीपणा होऊ देणार नाही.”अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, प्राथमिक चौकशीतून हा आतंकवादी कट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उच्च सतर्कतेचा आदेश
या घटनेनंतर दिल्ली तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे. मेट्रो, रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.लाल किल्ल्यासारख्या ऐतिहासिक आणि संवेदनशील स्थळाजवळ झालेला हा स्फोट राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा इशारा मानला जात आहे. नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





























