भाविकांनी हर हर महादेवाच्या गजरात भोले शंकरापुढे टेकला माथा

अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या प्रतापगड येथील एेतिहासिक यात्रेला महाशिवरात्रीनिमित्त रविवारपासून (ता. १५) सुरवात झाली असून, आज पहिल्या लाखो भाविकांनी हर हर महादेवाच्या गजरात भोले शंकरापुढे आपला माथा टेकला, दर्शन घेतले. त्याबरोबरच अधिकारी, विविध पक्षांचे नेते यांनीही भोले शंकर व ख्वाजा गणी हारुनी यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतले. ही यात्रा २० फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे.

प्रशासनाच्या वतीने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक संघटनांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाबरोबरच पोलिस विभागानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे. संपूर्ण यात्रेवर पोलिस विभागाच्या वतीने कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.
आमदार राजकुमार बडोले यांनी गडावरील शिवमंदिरात जाऊन मतदार संघातील जनतेसाठी व राज्यासाठी भोलेनाथाला साकडे घातले. त्याप्रमाणेच ख्वाजा उस्मान गणी हारूनी यांच्या दर्ग्यालाही भेट देऊन आशीर्वाद घेतला. आमदार नाना पटोले यांनी सुद्धा या ठिकाणी भेट देऊन प्राचीन शिव मंदिरात अभिषेक केला. तसेच ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांच्या दर्ग्याला भेट दिली.
अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनीही गडावर जाऊन प्राचीन शिव मंदिरात व शेजारील मूर्तीचे दर्शन घेतले तसेच यात्रेनिमित्त प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.
पायथ्यापासून सात किलोमीटर उंचीवर प्रतापगड किल्ल्याच्या एका दरीत स्थापीत असलेल्या प्राचीन भगवान शंकराच्या मंदिरात राज्यातील व परप्रांतीय शिवभक्तांनी नवस फेडले, काहींनी नवस कबुलले, दुःखहर्ता, विघ्नहर्ता भगवान शंकराची पूजा, अर्चना केली. गेल्या दोन-तीन दिवसांपासूनच महादेवा जातो गा संभा माझ्या… टोंगरा-टोंगरा पाणी-नंदी लागला पोहणी, हर बोला हर हर महादेव अशी गाणी, भोले शंकराचा जय-जयकार, घोषणा देत अनेके पोहे (जत्थे) प्रतापगडच्या यात्रेच्या दिशेने रस्त्यात जाताना पाहायला मिळत आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे.
पहाटे चार वाजेपासूनच भगवान श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांचे जत्थे पर्वतावरील प्राचीन शिव मंदिराकडे जाताना दृष्टीस पडले.
स्थानिक जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यतील भाविकांबरोबरच परप्रांतीय भाविकांनी व पर्यटकांनी येथे लाखोच्या संख्येत हजेरी लावली आहे. भगवान भोलेनाथांच्या मंदिरात व शेजारील मूर्तीवर माथा टेकण्याबरोबरच मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांच्या दर्ग्यावर भाविकांनी चादर चढविली.

Raksha Times
Author: Raksha Times

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!