अर्जुनी मोरगाव येथे ग्रीन जिमचे काम निकृष्ट दर्जाचे : १० लाखांचा निधी वाया गेल्याचा नागरिकांचा आरोप

अर्जुनी/मोरगाव (प्रतिनिधी):
अर्जुनी मोरगाव नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ५ येथे माता मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या ग्रीन जिमच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सदर काम उत्कृष्ट दर्जाचे आहे की पूर्णतः निकृष्ट — याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, प्रत्यक्ष पाहणीत कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या ग्रीन जिम प्रकल्पासाठी सुमारे १० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र एवढ्या मोठ्या रकमेवर उभारण्यात आलेल्या जिममधील साहित्य, व्यायाम यंत्रसामग्रीची बसवणूक, सिमेंट काँक्रीटचे काम, लोखंडी संरचना तसेच एकूणच कामाचा दर्जा पाहता गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी अपूर्ण काम, हलक्या प्रतीचे साहित्य आणि नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, सदर कामाचे कंत्राट महात्मा फुले मागासवर्गीय मजूर सहकारी संस्था, बोरगाव (बाजार), जिल्हा गोंदिया यांना देण्यात आले होते. मात्र संबंधित संस्थेकडून करण्यात आलेले ग्रीन जिमचे काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करावी, दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित अभियंता व जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत संबंधित कंपनीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत त्या कंपनीची अमानत रक्कम जप्त करावी, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
सार्वजनिक आरोग्य व नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये जर निकृष्ट दर्जाचे काम होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.
Raksha Times
Author: Raksha Times

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!