अर्जुनी-मोर.कुलदीपसिंग राठोड
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका येथील कुसुम चैताराम कापगते यांच्या निर्घृण हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कायदा व सुव्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार नानाभाऊ पटोले, खासदार प्रशांत पडोळे तसेच दिलीप बन्सोड यांनी स्व. कुसुम कापगते यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कापगते कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
अचानकपणे कुटुंबातील सदस्य गमावल्याने कापगते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना मानसिक आधार देत, घटनेबाबत संवेदना व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी स्व. कुसुम चैताराम कापगते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या दुःखद प्रसंगातून कुटुंबीयांना सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.





























